छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पूजापाठ, धार्मिक विधी करून उपजीविका भागविणार्या तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळी आरपार गेल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सिडको एन-६ भागात शनिवारी सायंकाळी घडली. समीर नाईक (वय ३४, रा. साई कृपा हाउसिंग सोसायटी, सिडको एन-६) असे तरुणाचे नाव आहे.तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, समीर हा मागील आठ वर्षांपासून सिडको एन-६ परिसरात राहतो. वडील वारल्यानंतर तो आई आणि लहान भावासह राहतो. त्याच्या आईचे बजरंग चौकात बांगड्याचे दुकान आहे. शनिवारी समीर त्याच्या आईसोबत घरी होता. सायंकाळी पाच वाजता त्याची आई ’मी दुकानात जाते’ असे म्हणून बाहेर पडली. तेथे दुकानावर बसलेल्या त्याच्या लहान भावाला घरी पाठवत दोघे मिळून जेवण करा म्हणून सांगितले. त्यानंतर बजरंग चौकातून निघून लहान भाऊ घरी आला, तेव्हा समीर हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.
जवळच राहणार्या काकाच्या मदतीने त्याला भावाने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डीआयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू असताना नातेवाइकांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य पाहून सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड व उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. समीरने डोक्यात झाडलेली पिस्तुलातील गोळी पोलिसांना सापडली असून सोबत काडतूसही आहे. परंतु, त्याने गोळी का झाडून घेतली, त्याच्याकडे पिस्तूल कुठून आले, हे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत. तपासादरम्यान घरातून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक रिकामे काडतूस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.










